बुधवार, ३ जुलै, २०१३

गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी...!!!

10 जुन 1995... अजुनही आठवतोय तो दिवस... वयाची 5 वर्ष देखील नीट पुर्ण झालेली नसताना बाबांची बदली ओरोसला झाल्यामुळे मी मळगांवमधुन ओरोसला आलो. त्यावेळी गावातले घर कौलारु आणि जमिन शेणाने सारवलेली असल्याने ओरोसच्या कलेक्टर काँलनीतील सिमेँटच्या दुमजली इमारती बघुन मला विलक्षण कुतुहल वाटले.त्यात करुन आम्हाला वरचा मजल्यावर खोली मिळाल्याने मी खुपच आनंदित झालो. त्या दिवसापासुन अगदी आजपर्यँत माझ्या आयुष्यातील प्रत्येक सुख-दुःखात, यशापयशाच्या वेळी ती रुम कायम माझ्यासोबत राहिली. माझ वयच आतास कुठे २३ वर्षे असेल आणि त्यापैकी तब्बल १७ वर्षे माझी सोबत करणारी ती रुम आता मला कायमस्वरुपी सोडावी लागली. लहान असताना सजीव-निर्जीव गोष्टीतील फरक शिकलो होतो की, निर्जीव वस्तु असंवेदनशील किंवा भावनाशुन्य असतात पण आज एक गोष्ट स्वानुभवावरुन लक्षात येतेय ती म्हणजे जेव्हा या निर्जीव गोष्टीँमध्ये आपल्या भावना गुंततात तेव्हा त्याच आपल्याला संवेदनशील वाटु लागतात. एखाद्या व्यक्तीवर जसे जिवापाड प्रेम करावे तितकेच प्रेम त्यांच्यावर आपण करु लागतो आणि जेव्हा त्यांना कायमचा निरोप द्यायची वेळ येते तेव्हा त्यांच्यामधे गुंतलेला आपला जीव कासावीस होतो. तस बघायला गेल तर गावाकडे आमच भलमोठ घर आहे, उद्या नोकरी मिळाल्यावर भविष्यात एखादा बंगला देखील बांधु शकेन पण तरीही आज ही 1 BHK रुम त्या सर्व ऐहिक सुखांपेक्षा कितीतरी पटीने प्रिय वाटतेय कारण त्या एवढ्याशा जागेत माझ्या लहानपणापासुनच्या सर्व आठवणी, भावना गुंतलेल्या होत्या. पैशांच्या श्रीमंतीने बाकी ब-याच गोष्टी विकत घेता येतील पण या गोष्टी नक्कीच मिळणार नाहीत. सावरकरांनी 'सागरास' या कवितेत एक ओळ लिहिली होती, "प्रासाद इथे भव्य परी मज भारी, आईची झोपडी प्यारी..." त्या ओळीँमागच्या भावना आता मी अनुभवतोय. शालेय शिक्षण घेताना आणि पुढे अगदी बारावी पर्यँत मी ओरोसलाच राहत असल्याने त्यावेळी या रुमची किँवा ओरोसमधील आजुबाजुच्या निसर्गाची तेवढीशी किँमत कधी वाटली नाही. म्हणतात ना, चंदनाची जंगले असलेल्या भागात आदिवासी लोक जळावासाठी चंदनाच्याच लाकडाचा उपयोग करतात कारण त्यांना सतत चंदनाच्याच सहवासात राहिल्याने चंदनाच्या लाकडाची खरी आणि सुवासाची किँमत कधीच माहित नसते. मी सुद्धा जेव्हा इंजिनिअरीँगसाठी कोल्हापुरला राहायला गेलो तेव्हा झाडांची कमतरता, पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य, बारमाही चिखलमिश्रीत पंचगंगेचे पाणी, सतत उडणारी धुळ, गलिच्छ वस्त्या आणि निसर्गाच्या दुर्देशेमुळे भयाण वाटणारा तो प्रांत पाहुन मला माझ्या ओरोसमधील पर्यावरणाची आणि माझ्या रुमची खरी किँमत कळु लागली. दर शनिवारी किँवा जेव्हा कधी सुट्टी मिळेल तेव्हा लगेचच मी ओरोसची वाट धरु लागलो. आजुबाजुच्या लोकांना वाटायचे की आई-बाबांची आठवण येते म्हणुन मी हे उपद्व्याप करतो पण मला खरी ओढ होती ती माझ्या ओरोसमधील रुमची, आमच्या आजुबाजुला असलेल्या निसर्गसंपन्न पर्यावरणाची...! कोल्हापुरमधुन ओरोसला आल्यावर जिकडे झाडांची संख्या जास्त आहे अशा काही माझ्या ठरलेल्या जागा होत्या तिथे एकटाच जाऊन तासनतास बसायचो. जणु काही माझी आणि त्या झाडांची खुप दिवसांपासुनची ओळख आहे. तो एकांत मला हवाहवासा वाटायचा कारण त्या काही तासात मी आयुष्यातील सगळी दुःख, मनस्ताप यांच्या खुप पलीकडे गेलेला असायचो. इंजिनिअरीँगच्या P.L. चालु झाल्या की मी दुपारी हमखास 1-2 तास माझ्या आवडत्या ठिकाणांवर एकटाच शांत बसुन सगळा तणाव दुर करायचो. एवढच नाही एखादा पेपर कठीण गेला आणि पुढच्या पेपरपर्यँत 2-3 दिवसांची सुट्टी असेल तर मी लगेच कोल्हापुरातुन ओरोसला यायचो. सगळा ताणतणाव, थकवा लगेच निघुन जायचा आणि पुढचा पेपर सोपा जायचा. ओरोसची रुम आणि आजुबाजुचा परिसर याची माझ्या आयुष्यात असलेली अमुल्य किँमत फक्त मलाच माहित आहे. आठवीपर्यँत पर्यावरणाची पुस्तके वाचुन कधी निसर्गाची खरी किँमत कळत नाही. त्यासाठी निसर्ग अनुभवावा लागतो. आज मी एखाद्या कट्टर पर्यावरणवाद्याप्रमाणे मायनिँग आणि कोकणात येणा-या जैतापुरसारख्या विनाशकारी प्रकल्पांना जिवाचा आटापिटा करत विरोध करतोय कारण एकदा का कोकणच पर्यावरण नष्ट झाल तर घाटामध्ये आणि आपणात फारसा फरक राहणार नाही. मी जेव्हा कोकणच्या राजकारणावर लिहू लागलो, तेव्हा राजकीय लेख लिहिताना कित्येकदा मोठमोठ्या राजकीय नेत्यांवर टीकास्त्र सोडावे लागले, त्यामुळे त्यांच्या समर्थकांचा राग ओढवून घेत त्यांच्या धमक्याचा सामना करावा लागला पण ओरोसमध्ये माझ्यासाठी जीव की प्राण करणा-या मित्रांचीच संख्याच इतकी होती की मला ओरोसमध्ये राहून यापैकी कोणाच्याच धमक्यांना भिक घालून माघार घ्यायची वेळ कधीच आली नाही. आता यापुढच्या आयुष्यात माझ्या त्या सगळ्या मित्रांची उणीव मला नेहमीच भासत राहिल. आता खुप वाटतय की आयुष्य मागे नेता आल असत तर खुप बर झाल असत पण आलेल्या दिवसाला सामोर गेलच पाहिजे हाच निसर्गाचा नियम आहे आणि याच नियमानुसार आता ओरोसशी माझे असलेले इतक्या वर्षाँचे ऋणानुबंध कायमचे तुटलेले आहेत. काही सत्य कटु वाटत असली तरी त्यांचा स्वीकार करण्यावाचुन अन्य कोणताच पर्याय आपल्याकडे नसतो. लहानपणापासुन प्रत्येक गोष्टीसाठी या रुमचा आधार घ्यायची सवय झाल्याने आता अशा प्रसंगी खुप खुप एकट पडल्यासारख वाटत पण आयुष्यच आहे आणि ते चालतच राहणार. ओरोसमधील लोकांचे लाडके दैवत श्री देव रवळनाथ, ज्याच्या छत्र-छायेखाली गेली 17 वर्षे मी सुखात काढली त्याला एकच गा-हाण घालेन की आयुष्याची समाप्ती होण्याअगोदर अजुन काही वर्षे ओरोसमध्ये त्याच्या छत्रछायेखाली राहण्याचे भाग्य मला प्राप्त होऊ देत. तसही सिँधुदुर्गातच राहत असल्याने यापुढेही ओरोसला खुपदा येण-जाण होईल, त्यावेळी सगळे मित्र, शिक्षक भेटतील, अगदी देवळात गेल्यावर देवही भेटेल पण पुन्हा कधीच माझ्यासोबत नसणार आहे ती गेली 17 वर्षे सावलीप्रमाणे माझ्याजवळ राहणारी, माझी लाडकी रुम...! याअगोदर माझे कित्येक लेख माझ्या मित्रांना आवडले त्यामानाने हा लेख कंटाळवाणा वाटेल मात्र तरीही माझ्यासाठी तो आतापर्यँतचा सर्वोत्क्रुष्ट लेख आहे कारण माझ्या रुमप्रती असलेल्या नाजुक भावना या लेखात अडकल्या आहेत. लेखाच्या सरतेशेवटी ओरोससाठी आणि तिथल्या लोकांसाठी एकच गाण सादर अर्पण करावास वाटत -
"तुमको भी ही खबर,
मुझको भी ही पता,
हो राहा ही जुदा,
दोनो का आसामा ,
दूर जाके भी मुझ से,
तुम मेरी यादो मी रहाना,
कभी अलविदा ना कहना...
कभी अलविदा ना कहना..."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा